कळसूबाई शिखर -एक अनुभव
मी वसंत मुरलीधर सालगुडे (नाशिक) श्री विलास, सुनिल, ज्ञानेश्वर शिवाजी खांडबहाले (महिरावणी ) आदि
आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वात उंच असलेले कळसूबाईचे शिखर सफर करण्याचे ठरविले.
आम्ही सर्वानी ठरवले की, दि. १५/१०/२०१७ रविवार रोजी पहाटे ५ वाजता कळसुबाई शिखर ट्रेकिंग साठी नाशिक हून निघून टाकेद मार्गे जायचे. परंतु निघताना थोडा उशीर होऊन सकाळी ६ वाजता टाकेदला निघालो.
(१)सर्वतीर्थ टाकेद
व सकाळी ८.३० वाजता तेथे पोहचलो.
सर्वतीर्थ टाकेद हे देखील अतिशय चांगले देवस्थान आहे. तेथे जटायूचे मंदिर व मोठे शिल्प आहे. रामायण काळात प्रभू श्रीराम ,लक्ष्मण सीता माई यांनी १४ वर्ष वनवास भोगताना नाशिक पंचवटी येथे वास्तव्य केले आहे.
पंचवटी येथून 5सीता माईचे रावणाने अपहरण केले. व पुष्पक विमानाने लंकेला घेऊन जातांना जटायू पक्ष्याने त्यास प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा रावणाने जटायूचे पंख छाटले. त्यामुळे जटायू घायाळ होऊन मूर्च्छित पडला. व प्रभू राम चंद्राची वाट पाहत होता.
प्रभू राम तेथे आल्या नंतर जटायूला मूर्च्छित पाहून त्यांनी तेथे बाण मारुन पाणी काढले व जटायूला पाजले व प्रभू रामचंद्रांच्या चरणी देह त्याग केला.
तेच हे ठिकाण म्हणजे टाकेद होय.
टाकेद येथे शंकर महादेवाची पिंड आहे.त्या पिंडीतून साधारणतः २.५० फूट खोलीवरून एक गोटा काढण्याचा एक वेगळाच अनुभव येतो. असे म्हणतात की, आपणास तो गोटा काढता आला तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते.
(२) कळसुबाई शिखर
कळसूबाई चे शिखर समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर उंच आहे.त्यामुळे वाटतं होते की शिखर सर करणे सोपे असेल.परंतु प्रत्यक्ष अनुभव घेतांना बरेच कठीण वाटले.
आम्ही सर्व टाकेद हून सकाळी ९:०० वाजता कळसुबाई कडे जाण्यासाठी निघालो. बारी गावाजवळ पोहचताच आमचा कळसुबाई शिखराकडे पायी जाण्याचा प्रवास सुरु झाला. बारी पासून पश्चिम बाजूस एक नाला ओलांडून हिरवेगार भाताच्या शेताच्या कडेने नयनरम्य निसर्ग न्याहळत १ किमी अंतरावर कळसुबाई चे मंदिर आहे. तेथे भोजन करून पुढे ट्रेकिंग ला सुरुवात केली. त्यात बराच पाऊस झाला. तसेच चिखल पाण्यातून वाट काढीत निघालो. टप्या-टप्यावर छोटी छोटी दुकाने होती. त्यातून तेथील स्थानिकांना थोडीफार कमाई होते. नवरात्रोत्सवात खूप गर्दी असते परंतु सध्या शनिवार -रविवारी या दोन दिवस लोक येतात,असे त्या स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. अश्या दोन टेकड्या चढून गेल्यानंतर डोंगरास कडा असल्याने साधारणतः ७० अंश कोनातून १५० फूट लांबीची लोखंडी शिडी ने टेकडी चढलो. तेव्हा वाटले होते की, आता शिखर आले,परंतु परतीच्या लोकान्नी सांगितले की,अजून तुम्हाला ६०% अंतर जायचे आहे. पुन्हा थोडी विश्रांती घेऊन पुढे प्रवास सुरु केला. पुन्हा एक शिडी चढून गेल्यानंतर दुरून दुरूनच कळसूबाईचे शिखर साधारणतः दोन किमी अंतरावर दिसत होते.त्यामुळे पुन्हा असे वाटायचे की आता इथूनच परत माघारी जावे, कारण खूपच थकवा आला होता, परंतु थोडा धीर व विश्रांती घेऊन मार्गक्रमण करत निसर्गाचा अनमोल नजारा अनुभवत ३. ३० वाजता शिखरावर पोहचलो व जणूकाही स्वर्ग गाठला,असे वाटले. शिखरावर कळसूबाईचे टुमदार मंदिर आहे. तेथे दर्शन घेतले. शिखरावर पश्चिमेस दरी व पलीकडे डोंगरावर नयनरम्य परिसर ,ढग धुके आदी नजराणा पहावयास मिळाला. शिखरावरून आग्नेय बाजूस भंडारदरा धरण अंधुकशे साधारणतः १० किमी अंतरावर दिसत होते.
थोडी विश्रांती घेऊन आम्ही सर्व शिखरावरून परतीच्या प्रवासास लागलो. एक दोन टेकड्या उतरून आल्यावर एका टेकडीच्या खाली शिडीवरून उतरताना खूप खबरदारी घेऊन उतरावे लागत होते. त्याच थोड्याशा पठारी भागावर खूप माकडे पाहावयास मिळाली. शेवटी खाली असलेल्या मंदिराजवळ आलोतेव्हा सायंकाळचे ६.३० वाजले होते.
खाली बारी गावाहून आम्ही रात्रीचे ७.३० वाजले असताना निघून घरी रात्री ९.३० वाजता पोहचतो. घरी आल्यावर मन खूप आनंदित झाले परंतु पाय मात्र थकले असल्याचे जाणवत होते.
अशा या निसर्गमय वातावरणाचा अनुभव घ्यायला खरंच हरकत नाही.
Comments
Post a Comment